भारतीय बनावटीची विमानवाहू नौका

नवी दिल्ली – पूर्णपणे भारतीय बनावटीच्या पहिल्याच विमानवाहू युद्धनौकेचे अवतरण नुकतेच करण्यात आले. कोचीन बंदरामध्ये झालेल्या या समारंभात संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांच्या पत्नी एलिझाबेथ अँटनी यांच्या हस्ते या नौकेचे अवतरण करण्यात आले. २००९ सालपासून ही युद्धनौका बांधण्याचे काम सुरू होते आणि ती ४० हजार टन वजनाची आहे. तिचे अवतरण आज होत असले तरी ती प्रत्यक्षात भारताच्या नौदलामध्ये २०१८ साली दाखल होणार आहे.

पूर्णपणे देशी बनावटीची युद्धनौका तयार करण्याची क्षमता जगातल्या सात देशांमध्ये आहे. भारताने आता त्या मोजक्या देशांमध्ये शिरकाव केला आहे. या नौकेसाठी लागणारे उच्च दर्जाचे पोलाद भारतातल्याच पोलाद प्रकल्पात तयार करण्यात आलेले आहे आणि तिच्यावरून चार प्रकारची लढाऊ विमाने उड्डाण करू शकतील एवढा तिचा प्लॅटफॉर्म व्यापक करण्यात आला आहे.