मुंबई – मूत्रपिंडे निकामी झालेल्या मुंबई जवळच्या दहिसरच्या भारती ठक्कर या ५० वर्षीय महिलेला सरकारच्या लालफितीचा असा काही फटका बसला की, तिला लालफितीमुळे लवकर मूत्रपिंड मिळाले नाही आणि प्राण गमवावा लागला. या महिलेला सहा महिन्यांपूर्वी गुजरातेतील एका व्यक्तीकडून मूत्रपिंड मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये अवयव दानाविषयीचे कायदे कडक आहेत. त्यानुसार अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यातच या महिलेचा पती प्रकाश ठक्कर याची दमछाक झाली.
लालफितीने अखेर तिचा प्राण घेतला
प्रकाश ठक्कर यांना मुंबई ते गुजरात आणि गुजरात ते मुंबई अशा सहा महिन्यात दहा चकरा माराव्या लागल्या. परंतु एवढ्या चकरा मारून सुद्धा मूत्रपिंड दानाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ती कागदपत्रे त्यांना मिळू शकली नाहीत. २०१२ च्या सप्टेंबरपासून जुलै २०१३ पर्यंत मूत्रपिंड दानाचे हे प्रकरण रखडले. शेवटी या महिलेला १८ जुलै २०१३ रोजी मृत्यू आला.
भारती ठक्कर यांच्यासाठी एखादे मूत्रपिंड मिळत असे. परंतु ती देणारी व्यक्ती कोण आहे याची चौकशी होऊन त्या मूत्रपिंड दानाला कायद्याने प्रतिबंध केला जात असे. एखाद्या व्यक्तीचे मूत्रपिंड दान कायद्यात बसले तरी रक्तगट जुळत नसे. अशा अनेक अडचणी येऊन शेवटी एका गुजराती दांपत्याचे मूत्रपिंड दान कायद्यात बसले, परंतु कायद्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात एवढा वेळ गेला की, भारती ठक्कर यांची प्रकृती झपाट्याने खालावत जाऊन त्यांना मृत्यू आला.
