कांदानिर्यातबंदी उठवणार नाहीˆ: ना शरद पवार

पुणे, -कांद्याचे दर वाढणे आणि कमी होणे,याला शेतकर्‍यांच्या वेदनेचीही काही बाजू आहे हे लोकांनी समजून घ्यावे कारण कांद्याचे दर वाढल्यावर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते, पण जेव्हा कांद्याचे दर कोसळतात, त्या वेळी शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येते. रोजच्या जेवणाच्या खर्चाच्या तुलनेत कांद्याचा खर्च किती असतो? असा सवाल उपस्थित करून कांद्यावर निर्यातबंदी आणणार नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक सभेत पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, दुष्काळी स्थितीत नाशिक, सोलापूर भागातील शेतकर्‍यांनी टँकरने पाणी आणून पिके जगविली. त्यासाठी शेतकर्‍यांनी कर्जाचे ओझे डोक्यावर घेवून बागा जगविल्या. त्यामुळे शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढला. अशा परिस्थितीतही शेतकर्‍यांनी देशाची गरज भागविली. लोकसभेत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. याविषयी बोलताना पवार म्हणाले की, कोणत्याही शेतीमालाच्या निर्यातीला बंदी घालणार नाही. शेतकर्‍याला जगाची बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.

शेतकर्‍याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे. शेतीवरील सर्व बंधने हटविली पाहिजे. जर शेतकर्‍याच्या मालाला योग्य किंमत मिळाली नाही तर त्याने आत्महत्येच्या रस्त्याने जायचे का? असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. सर्व परिस्थितीत नागरिकांनी शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. बळीराजाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.