अरेबिया – पश्चिम आशिया आणि विशेष करून सौदी अरेबियामध्ये पसरत चाललेल्या ‘मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ अर्थात मर्स या प्राणघातक रोगाच्या विषाणूंचा उगम उंटांकडून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये आतापर्यंत या रोगाने 94 बळी घेतले असून त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे 46 बळी सौदी अरेबियातील नागरिकांचे आहेत.
सौदीमध्ये उंटांकडून होतोय ‘मर्स’चा फैलाव?
या रोगाने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर संशोधकांनी तेथील विविध प्राण्यांच्या शरीरातून रक्ताचे 349 नमुने घेतले. त्यामध्ये एक मदारवाले भारतीय किंवा अरबी प्रजातीचे उंट, गायी, मेंढ्या आणि शेळ्यांचा समावेश होता. हे प्राणी देखील ओमान, हॉलंड, स्पेन आणि चिली अशा वेगवेगळ्या देशांमधील होते. त्यांच्या त्यानच्या नमुन्यांमध्ये मर्स सीओव्ही’ अर्थात मर्स करोना व्हायरसचे’ अस्तित्व सापडते का ते पाहण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. त्याच प्रकारे सार्स या मर्सशी जवळीक असलेल्या रोगाच्या विषाणूच्या अस्तित्वाचीही तपासणी करण्यात आली.
या नमुन्यांमध्ये या दोन्ही विषाणूंना प्रतिबंध करणारे प्रतिजीव आहेत का त्याची तपासणी करण्यात आली. घेतलेल्या 349 नमुन्यांपैकी गायी-म्हशी, मेंढया आणि शेळ्यांच्या 160 नमुन्यांमध्ये मर्स सीओव्हीशी संबंधित प्रतिजीवांचे अस्तित्व आढळले नाही. मात्र, ओमानमधील एक मदारवाल्या उंटांच्या 50 नमुन्यांमध्ये या विषाणूशी संबंधित प्रतिजीव आढळले. ओमानमधील हे नमुने विविध ठिकाणांहून गोळा करण्यात आले होते.
मर्स सीओव्ही किंवा तत्सम विषाणू या उंटांमधून या प्रदेशात मोठया प्रमाणात पसरत असल्याचा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला. त्याच प्रकारे कॅनरी र्यलडमधील एक मदारवाल्या उंटांमध्येही या विषाणूचे अस्तित्व दिसून आले. मात्र, याच प्रजातीच्या स्पेनमधील उंटांमध्ये हा प्रादुर्भाव दिसून आला नाही. या विषाणूचा फैलाव मानवातून मानवामध्ये अजूनही सुरू असताना, त्याबाबत निश्चित असा उपाय अद्याप सापडलेला नाही.
वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाणारे हे प्राणी या प्रदेशात अतिशय उपयुक्त ठरतात. आधुनिक वाहतुकीच्या साधनांमुळे त्यांचा वापर कमी झाला असला तरी त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्यांचा शर्यतीसाठी वापर करण्याबरोबरच त्यांचे मांस आणि दूध यांचा समावेश आखाती देशातील लोकांच्या आहारात असतो. त्यामुळे पुढील काळात उंटांच्या संपर्काबाबत आखाती देशांत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
