अमेरिकेत साडेसहा लाख हिंदी भाषक

वॉशिंग्टन – अमेरिकेतील हिंदी भाषा बोलणार्‍यांची संख्या वरचेवर वाढत चालली असल्याचे अमेरिकेतल्या भाषाविषयक पाहणीत आढळून आले आहे. अमेरिकेत अनेक भाषा बोलणारे लोक आहेत आणि भारतातून तिकडे गेलेले लोक मोठ्या प्रमाणावर आपापल्या मातृभाषांत परस्परांशी संबंध संपर्क साधत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या एखाद्या रस्त्यावरून फिरताना अचानकपणे परस्परांशी हिंदीतून बोलणारे लोक सापडतात. असे असले तरी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्‍या टॉप टेन भाषांमध्ये भारतातल्या कोणत्याही भाषेचा अद्याप तरी समावेश झालेला नाही. तसा तो झालेला नसला तरी दक्षिण आशियातल्या आणि विशेषतः भारतातल्या भाषांमध्ये बोलणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि एक ना एक दिवस भारतातली एखादी तरी भाषा टॉप टेन भाषांमध्ये जाईल असा विश्‍वास व्यक्त होत आहे.

गेल्या पाच वर्षात अमेरिकेत हिंदीमध्ये बोलणार्‍या लोकांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. मल्याळम्, तेलुगु आणि तामिळ या दक्षिण भारतीय भाषांमध्ये बोलणार्‍यांचे प्रमाणसुध्दा पाचवर्षात दुपटीहून जास्त झालेले आहे. पंजाबी, बंगाली आणि मराठी या तीन भाषांमध्ये परस्परांशी संबंध साधणार्‍या लोकांच्या संख्येत ८५ टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेत राहणार्‍यांमध्ये उर्दू आणि गुजराती या भाषा बोलणार्‍यांची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या पाच वर्षात त्यांच्या संख्येत झालेली वाढ अन्य भाषांच्या तुलनेत कमी आहे.

२०११ सालच्या पाहणीमध्ये अमेरिकते हिंदी बोलणार्‍यांची संख्या ६ लाख ४९ हजार आहे. उर्दू बोलणार्‍यांची संख्या ३ लाख ७३ हजार आणि गुजराती भाषकांची संख्या ३ लाख ५८ हजार आहे. भारतातल्या अन्य भाषा बोलणार्‍यांची संख्या सव्वा आठ लाख आहे. पंजाबी, बंगाली आणि मराठी याही भाषा अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. कन्नड बोलणार्‍यांची संख्या अमेरिकेत कमी आहे. भारतातली कोणतीही भाषा बोलणार्‍यांची संख्या १० लाखापर्यंत गेलेली नाही. परंतु हा मान चीनी, तगलोग, व्हिएतनामी, फे्रंच, जर्मन, कोरियन या भाषांनी मिळवला आहे.