गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कोणतेही नवे निर्बंध नाहीत; पोलिसांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


पुणे – पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहे. पण पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुण्यात असे कोणतेही नवे निर्बंध लागू केले नसल्याचे सांगितले आहे.

१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत पुणे शहरामध्ये १४४ कलम लावण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी जारी केले आहेत. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले असल्याची माहिती विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत होती. पण ह्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे प्रत्यक्ष शिसवे यांनीच सांगितले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर पुणेकरांनी विश्वास न ठेवण्याे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

यंदाही मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (१० सप्टेंबर) दुपारपर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेआधी मिरवणूक निघणार नसली, तरी या गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूटय़ूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.