आर्थर रोड कारागृहात दाऊद गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचे निधन


मुंबई – आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बांधकाम व्यावसायिक, बॉलिवूडमधील चित्रपट फायनान्सर आणि दाऊद गँगचा फायनान्सर युसूफ लकडावाला यांचे निधन झाले आहे. त्यांना आज दुपारी १२ वाजता मृत घोषित केले गेले. जमीन बळकावल्याप्रकरणी ईडीने लकडावाला यांना अटक केली होती.

युसूफ लकडावाला कर्करोगाने ग्रस्त होते आणि ६ सप्टेंबर रोजी त्यांना तुरुंगाच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. याबाबत माहिती देताना कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्करोगाने ७६ वर्षीय युसूफ लकडावाला आजारी होते. बुधवारी सकाळी त्यांना जेजे रुग्णालयात हलवण्यात आले होते. आज (गुरुवार) रुग्णालयाने युसूफ लकडावाला यांच्या मृत्यूची माहिती दिल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

युसूफ लकडावाला यांच्यावर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई केली होती. युसूफ लकडावाला यांच्यावर ५० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. तसेच त्यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि अवैधपणे जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या वंशजांच्या मालकीची खंडाळ्यातील जमीन बेकायदेशीररित्या लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. ईडीने याप्रकरणी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची २ जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती.