
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमधील मीरा-भाईंदर व चांदिवली विधानसभा क्षेत्रातील अनेक शिवसैनिकांनी आज (गुरूवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचे ठाणे प्रमुख अविनाश जाधव, मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत, कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप राणे यांच्यासह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. मुंबई महापालिका निवडणूक आगामी काळात होणार आहे, त्या अगोदर शिवबंधन तोडत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केल्यामुळे हा एकप्रकारे शिवसेनेला धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसल्याचे दिसून येत आहे. आपले संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आज मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील मोठ्याप्रमाणावर समावेश होता. दरम्यान, याप्रवेश सोहळ्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
