कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मृत्यू रोखण्यासाठी ९६.६ टक्के प्रभावशाली!


नवी दिल्ली – चीनमधून संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर काहीजणांनी कोरोनावर मात केल्यानंतर गंभीर आजारांना सामोरे जावे लागले आहे. याच दरम्यान कोरोनाचे घातक व्हेरिएंट समोर येत असल्यामुळे अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

लसीकरण हेच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रभावी हत्यार असून लसीकरण झाल्यानंतर नियमावली पाळल्यास कोरोनाला रोखण्यास मदत होणार आहे. आता कोरोनावरील लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोरोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात प्रभावशाली असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस मृत्यूदर रोखण्यासाठी ९६.६ टक्के प्रभावशाली आहे. तर दोन डोसनंतर त्याचा प्रभाव ९७.५ टक्क्यांपर्यंत वाढतो, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले आहे.