मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी फ.मु.शिंदे, संजय सोनवणी यांचे अर्ज दाखल

पुणे, – सासवड येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे आणि लेखक संजय सोनवणी या दोघांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्याकडे शुक्रवारी अर्ज दाखल केले.अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे हे 87 वे संमेलन आहे. फ.मु. शिंदे यांच्या अर्जावर सूचक म्हणून जेष्ठ कवी रामदास फुटाणे यांची स्वाक्षरी आहे तर अनुमोदक म्हणून साहित्यिक गुलाबराव कारले, माधव राजगुरू, उद्धव कानडे, दीपक कंरजीकर आणि अंजली कुलकर्णी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्या सुनिल महाजन उपस्थित होते शिंदे यांनी 2004 साली औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. परंतु त्यावेळी ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रा.ग.जाधव यांनी संमेलनाध्यक्षपदासाही अर्ज भरल्याने शिंदे यांनी माघार घेतली होती.

लोकांनी आपल्याला आतापर्यंत भरभरून प्रेम दिले आहे. संमेलनाध्यक्षपदी निवडून आलो, तर चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. सोमवारी औरंगाबद येथे मराठवाडा साहित्य परिषदेत अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘साहित्यात सद्भावनेचे वातावरण टिकणे गरजेचे आहे. संजय सोनवणी यांच्या अर्जावर सूचक म्हणून समीक्षक शकंर सारडा तर जेष्ठ विचारवंत हरी नरके, प्रकाशक अनिल कुलकर्णी, साहित्यिक जालिंदर चांदगुडे, अशोक सातपुते, विनोद सोनवणी हे अनुमोदक आहेत. ‘सर्व थरातील तरुण साहित्याच्या क्षेत्रात येऊ पाहत आहेत . त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात साहित्यातून जातीय संघर्ष रोखण्यासाठी व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोणवणी यांनी यावेळी सांगितले.