
मुंबई – कोरोनाचे दुष्ट सावट यंदाही गणेशोत्सवावर असून यादरम्यान मुंबईतील गणेशभक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहता येणार नाहीत. नुकतीच लालबागमधील सर्व गणेश मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान ऑनलाइन पद्धतीने लालबागमधील गणपतींचे दर्शन घेता येणार असल्याचे वृत्त एबीपीने दिले आहे.
लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती मुंबईतील गणेशभक्तांना पाहता येणार नाही
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. दरम्यान मुंबईत सर्वात जास्त गर्दी सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी लालबागमध्ये होत असते. लालबागमध्ये गणेशगल्ली, लालबागचा राजा, रंगारी बदक, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकास मेन्शन अशी अनेक गणेशमंडळे असून तिथे असणाऱ्या उंच मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्त नेहमी गर्दी करत असतात. यावेळी या मूर्ती चार फुटांच्या असणार आहेत.
गणेशमूर्तीची उंची कमी असली तरी, लालबागमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोणत्याही मंडळाच्या गणपतीचे दर्शन बाहेरुन येणाऱ्या गणेशभक्तांना घेता येणार नाही. पण तेथील रहिवासी, स्थानिकांना हे दर्शन घेता येणार आहे. मंडळांकडून गणेशभक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलीस आणि सार्वजनिक मंडळांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळांना तसे आदेश देण्यात आले.
