पुणे- ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचे गुरूवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गुरूवारी सकाळी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बेळगावमध्ये १९२६ साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचे नाव नारायणराव जाधव होतं. बेळगावमध्ये दोन वर्षं गायकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जयपूर घराण्याच्या मोगुबाईंकडे घेतलं. १९४२पासून मराठी रंगभूमीवर अनेक अजरामर भूमिका यांनी केल्या.
संगीत रंगभूमीवर स्वतःची परंपरा सांगणा-या आणि बालगंधर्वांच्या बरोबरीने काम केलेल्या कलाकार म्हणून जयमाला शिलेदार यांची ओळख होती. संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, संगीत शारदा ही जयमाला याची गाजलेली नाटके होती.
२००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमतानं निवड झाली होती. हे नाट्यसंमेलन अहमदनगर येथे भरवण्यात आलं होतं. जयमालाना तीन वेळा बालगंधर्व पुरस्कार, २००६मध्ये लता मंगेशकर पुरस्कार, तर यंदा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळं संपूर्ण संगीत क्षेत्रावर आणि संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांना अनेक मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली.