अमेरिकेवर संहारक हल्ल्याची अल-कायदाची तयारी

वॉशिंग्टन – अमेरिकेचा आखातातील हस्तक्षेप दूर करण्यासाठी त्यांचे दूतावास उडवून लावा. त्यासाठी 9/11 पेक्षाही भयंकर हल्ले करा, असा आदेश अल-कायदाच्या म्होरक्याने दिला आहे. एका ऑनलाइन संदेशातून अल-कायदाचे मनसुबे स्पष्ट झाल्याने अमेरिका हादरली आहे. अल-कायदाचा आखाती प्रदेशातील दहशतवादी कारवायांचा प्रमुख नसीर अल-वुहायशी व अयमान-अल-जवाहिरी यांच्यात गेल्या आठवड्यात संभाषण झाले. त्या संभाषणातून ही माहिती पुढे आली आहे.

11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यापेक्षा भयंकर स्वरूपाचे हल्ले करण्याचे त्या संदेशात म्हटल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सकडून करण्यात आला आहे. सुरुवातीला येमेनमधील अमेरिकेचे दूतावास उडवून लावण्यात यावे. हल्ला रविवारच्या आत करण्याची सूचनाही जवाहिरीने त्या संदेशात केली आहे. येमेनसह प्रदेशात अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देशांच्या हिताला बाधा पोहोचली पाहिजे, ते संपुष्टात आले पाहिजेत.

अल-कायदाच्या धमकीनंतर अमेरिकेने भीतीपोटी आखाती तसेच मुस्लिम राष्ट्रांतील आपली राजदूत कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर 19 दूतावास 10 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचाही निर्णय अमेरिकेने घेतला आहे. 62 वर्षीय जवाहिरी हाच ओसामा-बिन-लादेनच्या खात्म्यानंतर अल-कायदाचा म्होरक्या बनला. दोन्ही दहशतवाद्यांतील हा संदेश ऑडिओ स्वरूपाचा असून तो ऑनलाइन पोस्ट केला होता. तो संदेश गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या हाती लागला. त्यामुळे अमेरिकेला दहशतवादी कारवायांची माहिती मिळाली आहे.

लादेनच्या खात्म्यानंतर अल-कायदाच्या दहशतवादी कारवायांवर बंधने आली आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे संघटनेची दहशत राहिली नसल्याची जाणीव जवाहिरीला झाली आहे. त्यामुळेच जगभरात पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी येमेनमधील संघटनेचा वापर करण्याची योजना आहे. कारण अल-कायदाची येमेनमधील संघटना सर्वांत मजबूत मानली जाते. त्यामुळेच जवाहिरीने अमेरिकेच्या येमेनच्या दूतावासावर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत.

अल-कायदाचे मनसुबे उघड करणारा ऑनलाइन संदेश हाती लागल्यानंतर अमेरिकेने दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आपल्या विशेष दलास सज्ज राहण्याचा इशारा दिला. संघटनेच्या आखातातील ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी केली जात आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हॅगेल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या विशेष दलास ही सूचना केली आहे. हल्ला करण्यास तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेंटागॉनने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर मंगळवारी येमेनमधील दूतावास कार्यालय पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे आता अनिश्‍चित काळासाठी येथील व्यवहार अमेरिकेला थांबवावे लागले आहेत.