शहीद कुंडलिक मानेंचं पार्थिव कोल्हापुराला रवाना

पुणे – पाकिस्तानच्या हल्ल्यातील शहीद कुंडलिक माने यांचं पार्थिव कोल्हापुरला रवाना करण्यात आलं. पिंपळगाव या मूळगावी कुंडलिक माने यांच्यावर उद्या सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. पूँछमध्ये शहीद झालेल्या कुंडलिक माने यांचं पार्थिव आज रात्री अकराच्या सुमारात पुण्यात दाखल झालं.

हवाई दलाच्या विशेष विमानातून पार्थिव पुण्यातील लोहगाव विमानतळावर आणण्यात आलं. तत्पूर्वी पार्थिव पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्काराकडून कुंडलिक माने यांना मानवंदना वाहण्यात आली. त्यानंतर पार्थिव कोल्हापुरला रवाना करण्यात आलं.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पूंछ सेक्टरमधील सरला लष्कर चौकीवर हल्ला केला. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील वीरपुत्र कुंडलिक माने यांच्यासह
चारजण बिहार रेजिमेंटच्या जवानांचा समावेश आहे. कुंडलिक माने यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या पिंपळगावावर सध्या शोककळा पसरली आहे.