215 आमदार करणार अवयव दान

मुंबई – जागतिक अवयव दान दिनाचं निमित्त साधून महाराष्ट्रातल्या 215 आमदारांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे. पेन्शन वाढीवरून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या आमदारांनी, एक स्तुत्य कार्य करण्याचाही निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सुरेश शेट्टी आणि रणजित कांबळे या मंत्र्यांनी तर अवयदाता होण्याची सगळी प्रक्रियाही पार पाडली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेचे सगळीकडे कौतुक होत आहे. गेल्या अधिवेशनात 215 आमदारांनी मृत्युनंतर अवयव दानाची इच्छा व्यक्त केली आहे. तर 2 मंत्री आणि 6 आमदारांनी अवयव दाता होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अवयनदान प्रक्रियेला वेग येताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यात आरोग्य विभागाला मोठे यश आले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अवयव दानाची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि लालफितशाहीत अडकल्याचे उघड झाले. त्यानंतर जागे झालेल्या महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2012 मध्ये विशेष अध्यादेश काढून ब्रेन डेड व्यक्ती घोषित करण्याचे अधिकार डॉक्टरांना दिले. सरकारच्या या प्रयत्नामुळे गेल्या 8 महिन्यात 103 जणांना ब्रेन डेड घोषित करणे शक्य झाले आहे. त्यापैकी 35 जणांच्या नातेवाईकांनी अवयव दानाला मान्यता दिली. त्यातून 111 अवयव आरोग्य विभागाला मिळाले.

जनसामान्यात वाढत असलेली ही जागृती आमदार आणि मंत्र्यामध्येही व्हावी म्हणून विधानसभा अधिवेशनात आमदार आणि मंत्र्यांना देखील अवयव दाता होण्याची विनंती करण्यात आली होती. आतापर्यंत मंत्र्यांपैकी स्वत: आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि रणजित कांबळे यांच्यासह इतर 6 आमदारांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 153 विधानसभा सदस्य आणि विधान परिषदेच्या 62 सदस्यांनी नाव नोंदवले असून, अवयव दाता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गेल्या 8 महिन्यातील स्थिती 35 जणांकडून 111 अवयव मिळाले. यामध्ये 61 किडनी, 23 लिव्हर आणि 27 डोळे प्रत्यापणासाठी उपलव्ध झाले आहेत. आरोग्य विभागाने ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेतही अवयवदाता होण्याच्या एक कलमाचा उपयोग सुरू केला आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठीही प्रवेश प्रक्रियेत कलमाचा समावेश लवकरच केला जाणार आहे.