
वडापावचा इतिहास, साधा वडापाव ते सोन्याचा वडापाव असा प्रवास
ट्विटरवर दुबईच्या एका दुकानात तब्बल १०० दिनार म्हणजे २००० रुपये मोजून मिळत असलेल्या सोन्याच्या वडापाव संदर्भातील एक पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे. ट्राफल बटर, चीजसह बनविलेल्या या वडापावाला चक्क २२ कॅरेट सोन्याचा वर्ख लावला गेला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या निमित्ताने वडापावचा इतिहास जाणून घेणे रोचक ठरेल.
वडापाव म्हटले की मुंबई सर्वप्रथम येते. आज देशविदेशात अनेक ठिकाणी, देशाच्या छोट्या गावाच्या कानाकोपऱ्यात वडापाव मिळतो पण जगात प्रसिद्ध आहे तो मुंबईचा वडापाव. मुंबई बाहेरून आलेले लोक येथे आवर्जून वडापावचा आस्वाद घेतात. स्ट्रीट फूड म्हणून कमालीचा लोकप्रिय बनलेल्या या वडापावचे जनक आहेत अशोक वैद्य. आज वैद्य हयात नाहीत मात्र यांचा मुलगा नरेंद्र वडिलांचा हा व्यवसाय त्याच उत्साहात आजही चालवत आहे.

वडापाव आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे एक वेगळे नाते आहे. मुंबईमध्ये दाक्षिणात्य लोकांची उडपी हॉटेल लोकप्रिय होताना पाहून बाळासाहेबांनी मराठी तरुणांनी पुढे येऊन महाराष्ट्रीय पदार्थाचा व्यवसाय सुरु करावा असे अपील केले आणि त्यापासून प्रेरणा घेऊन अशोक वैद्य यांनी दादर स्टेशन बाहेर १९६६ मध्ये स्टॉल सुरु केला. गिरणी कामगार, विद्यार्थी यांच्या मोठ्या रहदारीचे हे ठिकाण. वैद्य यांनी सुरवातीला पोहे, वडा आणि ऑम्लेट पाव विकायला सुरवात केली. मात्र एक दिवस नवीन प्रयोग म्हणून त्यांनी बटाटेवडा पावात घालून आणि चटणी लावून विकला आणि पाहता पाहता तो इतका लोकप्रिय झाला की आजही त्याच्या लोकप्रियतेला सीमा राहिलेली नाही.
वैद्य यांचा स्वस्त, खायला सोयीचा आणि पोटभरीचा वडापाव बाळासाहेब ठाकरे यानाही फारच आवडला. अनेकदा ते येथून वडापाव ऑर्डर करत असतच पण वैद्य यांच्याशी बाळासाहेब यांचा चांगला स्नेह जमला होता. बाळासाहेब अशोक वैद्य यांचे ग्राहक होते आणि मित्रही. गिरणी संप काळात अनेकांचे रोजगार गेले तेव्हा अनेक गिरणी कामगारांनी वडापाव गाड्या सुरु केल्या आणि येथून विविध चवीच्या वडापाव विक्रीची सुरवात झाली.

२०१५ मध्ये अशोक वैद्य आणि वडापाव यावर एक लघुफिल्म बनविली गेली आणि वडापाव जगभर लोकप्रिय झाला, तो इतका की, २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा होतो. अशोक वैद्य १९९८ साली निवर्तले मात्र यांच्या नरेंद्र, या फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतलेल्या मुलाने वडिलांचा हा व्यवसाय प्लॅटफॉर्म नंबर १ वर सुरु ठेवला आहे.
फिल्मी सितारे, क्रिकेटर्स, उद्योजकांपासून ते अगदी हातावर पोट असणारे मजूर आवडीने आणि चवीने वडापावचा आस्वाद दिवसा, रात्री कधीही घेतात यातच वडापावचे महत्व आणि त्याची लोकप्रियता दिसून येते असे म्हटले तर गैर काय?
