श्रीलंकेत खाद्य आणीबाणी जाहीर

श्रीलंका आर्थिक संकटामुळे अडचणीत आली असून देशात खाद्य आणीबाणी जाहीर केली गेली आहे. अनेक वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली असून व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी खाद्यान्नाची साठवण सुरु केली असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रपती गोटाबया राजपथे यांनी साखर, तांदूळ व अन्य गरजेच्या वस्तूंचा साठा संदर्भात कडक नियम लागू केले आहेत.

देशाच्या परकीय गंगाजळीत वेगाने घसरण झाल्याने कृषी रसायने, कार्स, मसाले, हळद आयातीत कपात झाली आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा पर्यटन हा मुख्य भाग आहे मात्र करोना मुळे पर्यटन क्षेत्र वाईट प्रकारे बाधित झाले असून या क्षेत्रातील ३० लाख रोजगार संकटात आले आहेत. शिवाय प्रदेशातून घेतलेले कर्ज भागविण्यासाठी सरकारला पैसे मोजावे लागत आहेत. कर्ज फेड आणि व्यापारातील नुकसान कमी करण्यासाठी सरकार संघर्ष करत आहे.

परिणामी टूथब्रश, स्ट्रोबेरी, सिरका, वेट वाइप्स, साखर अश्या शेकडो वस्तूंच्या आयातीवर बंदी आली आहे किंवा विशेष परवाना व्यवस्था आखली गेली आहे. मिडिया रिपोर्ट नुसार तांदूळ, साखर, कांदे, बटाटे, रॉकेल, दुध पावडर, स्वयंपाक गॅस यांच्या किमती वाढल्या आहेत आणि खरेदीसाठी लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.