बोलणी फिसकटल्याने एसटी कामगार उपोषणावर ठाम

पुणे, दि. 4 (प्रतिनिधी) – वेतन कराराची अंमलबजावणी करताना एसटी कामगार संघटनेला विश्‍वासात घेतले जात नाही. म्हणून 6 ऑगस्टपासून संघटनेेच्या पदाधिकार्‍यांनी आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता, या पार्श्‍वभूमीवर संघटना व प्रशासना दरम्यानची बोलणी फिसकटल्याने उपोषणाचा निर्णय कायम असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे सरचिटणिस हनुमंत ताटे यांनी दिली.

कामगार वेतन कराराच्या अंमलबजावणीबाबतची परिपत्रके काढताना मान्यता प्राप्त कामगार संघटनेशी चर्चा केली जाईल, असे प्रशासनाने कबूल केले होते. कराराच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्यावेळी त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये, कामगारांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी संघटनेशी चर्चा करणे आवश्यक आहे. मात्र, अशी चर्चा न करताच परिपत्रके जारी केली जात आहेत, असा आरोप ताटे यांनी केला.

एसटी प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संघटनेचे राज्यातील सर्व पदाधिकारी 6 ऑगस्टपासून आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत, तशी नोटीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना देण्यात आली आहे. उपोषणात चालक-वाहक व अन्य कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीच्या राज्यातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे ताटे यांनी सांगितले.