युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री


मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकित हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फूड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महिन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.

युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.

सामंजस्य करारावर मुलुंड आयटीआयचे प्राचार्य प्रदीप दुर्गे आणि आयटीसी हॉटेल लिमिटेडचे व्यवस्थापक (एचआर) धनंजय कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे मुलुंड आयटीआयमधील फूड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हीस असिस्टंट व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण प्राप्त होऊन हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होणार आहे. ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग पद्धतीअंतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला असून यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयमधील सैद्धांतिक प्रशिक्षणाबरोबरच औद्योगिक आस्थापना, कॉर्पोरेट तथा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची सुविधा प्राप्त होते.

याप्रसंगी मुलुंड आयटीआय संस्थेच्या अंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब) मंत्री मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर मियावाकी वृक्षारोपणाची पाहणी आणि वृक्षारोपणही करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. अ. म. जाधव, संस्थेचे उपप्राचार्य संदीप परदेशी, निरीक्षक अनिल सदाफुले यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.