नवी दिल्ली – 2008 च्या बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणातील आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सदस्य असलेला दहशतवादी शहजाद अहमद याला आज (मंगळवार) दिल्लीच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकिलांनी शहजादचा गुन्हा अत्यंत गंभीर मानत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी न्यायालयासमोर मागणी केली होती.
19 सप्टेंबर 2008 ला शहरातील जामिया नगर येथील बाटला हाऊसमच्या फ्लॅट नं. एल-18 मध्ये झालेल्या या एन्काऊंटरमध्ये पोलिस निरिक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्या केल्याबद्दल उत्तरप्रदेशच्या आजमगढ येथे राहणार्या शहजाद अहमद (वय 24) याला दिल्लीच्या साकेत न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र कुमार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकीलांचे पुरावे तसेच शहजादच्या वकीलांनी त्यांची बाजू माडंल्यावर न्यायालयाने या खटल्याची सुनावणी मंगळवारपर्यंत सुरक्षित ठेवली होती.
शहजादला मृत्यूदंडची मागणी करत असलेल्या सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले, की शहजादने पोलिस निरिक्षक शर्मा यांची हत्या, तसेच आपल्या कर्तव्याचे पालन करणार्या हेडकॉन्स्टेबल बलवंत सिंह आणि राजबीर सिंह यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्याला मृत्यूदंड देण्यात यावा. तर शहजादला शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने पोलिस निरिक्षक शर्मा यांच्या कुटुंबाला शर्मा यांच्या मृत्यूनंतर झालेल्या वेदनांचा, दुःखाचा विचार करुनच निर्णय द्यावा.’