रंगभूमीवर आवाज गुंजणार – एक साथ नमस्ते

मराठी रंगभूमीसाठी एकाहून एक सरस कलावंत, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांची फळी उभारणारे परळचे एम.डी एकांकिका स्पर्धांमधले दादा महाविद्यालय. एम.डी च्या या नाट्य इतिहासात एक मानाचे पान म्हणजे हृषिकेश कोळी लिखित आणि प्रल्हाद कुडतडकर दिग्दर्शित एकांकिका हिस्टरी ओफ़ लिजंड.

2006 सालच्या या एकांकिकेने महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फ़े भवन्स कला केंद्र आयोजित मुन्शी शिल्ड जिंकली आणि नंतर एम.डी साठीच तब्बल 65 पारितोषिकांवर आपले नाव कोरले. त्यानंतर गेल्या 7 वर्षांत ह्या एकांकिने अवघ्या महाराष्ट्रभर तिच्या वेगळ्या विषयामुळे आणि उत्सफुर्त सादरीकरणामुळे शंभरहून अधिक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जिंकुन आपलं स्वत्व सिध्द केलं.अशी ही एकांकिका हिस्टरी ओफ लिजंड व्यावसायिक रंगभूमीवर किरण लाळगे, गणेश गावकर आणि संदीप विचारे या तीन तरुण निर्मात्यांच्या उर्विजा थिएटर या बॅनरखाली एक साथ नमस्ते या नावाने दाखल होत आहे.

मुळातंच विषयातलं वेगळेपण आणि अभिव्यक्त होण्याचं धाडस बाळगून केलेले हा प्रयोग मराठी रंगभूमीवर अतिशय कुतुहलाचा भाग बनून राहिला आहे. कारण,जर भारतीय इतिहास नव्याने लिहण्याची वेळ आली तर काय होऊ शकेल हा एक वेगळाच दृष्टीकोन एक साथ नमस्ते मांडते आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावते. जशा मुलांच्या इयत्ता बदलत जातात तसा त्यांच्या समोर येणारा इतिहास बदलत जातो. मुलांचे अवांतर वाचन वाढले कि त्यांच्या समोर येणारा इतिहास वेगळा असतो कालांतराने इतिहासाचे अनेक बदलेले पैलू मुलांसमोर येतात आणि खरा इतिहास कोणता असा नवा प्रश्न निर्माण होतो. इतिहासात असलेल्या काही घटना आपल्याला का सांगितल्या जात नाहीत किंवा इतिहासातल्या घटनांची न लागणारी संगती नव्या पिढीपुढे अनेक प्रश्न निर्माण करतात.

नुकताच या नाटकाचा मुहूर्त दादरच्या सावरकर स्मारकात मराठी रंगभूमीवरील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विमल म्हात्रे, आरती सोळंकी, प्रणव रावराणे, संदीप रेडकर, मधुरा दिवेकर, अजय कांबळे, अभिषेक गावकर, गौरव मालणकर, भाग्यश्री पाणे, प्रमोद कदम, महेश वरवडेकर अभिनित हे नाटक ऑगस्ट मध्ये रंगभूमीवर येणार आहे.

Leave a Comment