बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक कार बाजारात

बीजिंग – बीएमडब्ल्यू या जर्मन कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात पदार्पण केले असून कंपनीची ऑल इलेक्ट्रिक आय-३ ही पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच एकाच वेळी आशिया, यूरोप आणि अमेरिका या तिन्ही खंडात उपलब्ध होणार आहे. भारतात या नव्या गाडीला प्रचंड मागणी येईल असा कंपनीचा अंदाज आहे आणि त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात ती भारतात सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लंडन, बीजिंग आणि न्यूयॉर्क या तीन मार्केटमध्ये ती २०१४ च्या जानेवारीमध्ये प्रत्यक्ष विक्रीस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यूरोप खंडातल्या सर्व बाजारांमध्ये ही गाडी ३५ हजार यूरोला मिळेल. अमेरिकेत ती ४१,३५० डॉलर्सला विकली जाईल. चीनच्या मार्केटमध्ये ती केवढ्यास मिळेल हे अजून जाहीर झालेले नाही. भारतात ती उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र ती भारतात कधी उपलब्ध होईल हे सांगता येत नाही, अशी माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली.

चौघांना बसता येईल अशी ही कार आहे आणि तिच्यामुळे हवेत प्रदूषण होणार नाही. तिची बॉडी कार्बन ङ्गायबरची असून ऍल्युमिनियम चॅसीवर ती बसविण्यात आलेली आहे. बीएमडब्ल्यू कंपनीने अशा रितीने कार्बन ङ्गायबरची बॉडी बनविण्याचा पहिला मान मिळविला आहे. या ङ्गायबरच्या बॉडीचे वजन स्टीलच्या बॉडीपेक्षा पन्नास टक्क्याने कमी आहे. ही गाडी त्यामुळे वजनाला हलकी झाली असली तरी तिच्यात बसविण्यात आलेल्या बॅटरीचे वजन २३० किलो आहे.