पर्यटन विकासासाठी क्लिन इंडिया मोहीम

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या पर्यटन विकास खात्याने भारतातल्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाकडे देशातली पाच पर्यटन स्थळे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता हे महामंडळ ताजमहल, अजिंठा वेरुळ लेणी, दिल्लीचा लाल किल्ला, हैदराबादजवळील बोवळकोंडा किल्ला आणि तमिळनाडूमधील महाबलिपूरम् या पाच पर्यटन स्थळांच्या विकासाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने भारतातल्या सगळ्या पर्यटन स्थळांच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या बरोबरच या स्थळांच्या परिसरात दिल्या जाणार्‍या सेवा कशा अद्ययावत करण्यात येतील याचीही योजना आखण्यात आली आहे. तिचाच एक भाग म्हणून तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाला ही पाच पर्यटन स्थळे विकसनासाठी म्हणून देण्यात येणार आहेत.

या योजनेतील ताजमहल दत्तक घेण्याचा कार्यक्रम पर्यटन मंत्री के. चिरंजिवी यांच्या हस्ते बुधवार दि. ३१ जुलै रोजी आग्रा येथे होणार आहे. महामंडळाशिवाय इतरही काही स्वयंसेवी संघटना या क्लिन इंडिया मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत.

Leave a Comment