गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट नको – राहुल गांधी

नवी दिल्ली दि. २७ –  पाच राज्यांत होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांत ज्या उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशांना या निवडणुकात उमेदवारीच्या शर्यतीतून मुळातच बाहेर ठेवले जावे असे आदेश काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांबाबतची रणनिती ठरविण्यासाठी त्यांनी दिल्लीत प्रभारी , काँग्रेस महासचिव व निवड समिती प्रमुखांची बैठक घेतली त्यात ते बोलत होते.

येत्या वर्षात मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, दिल्ली आणि छत्तीसगढ राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवार निवडताना त्यांची निवड दिल्लीतून अथवा राज्य मुख्यालयातून केली जाऊ नये अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अथवा यापूर्वी शिक्षा झालेल्यांना उमेदवार म्हणून निवडले जाऊ नये असे सांगतानाच त्यांनी तळागाळातील कार्यकर्ते, स्थानिक नेते यांचा सल्ला उमेदवार यादी निश्चित करताना घेतला जावा असेही पक्ष नेत्यांना बजावले आहे.