तीन महिन्यात पकडले ६० कोटींचे सोने

मुंबई दि.२७ – सरकारने सोन्यावरील आयात करात वाढ केल्यापासून सोने तस्करीत वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यात कस्टम विभागाने विविध ठिकाणांहून ५९.८२ कोटी रूपये किमतीचे चोरटे सोने जप्त केले आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३६५ टक्कयांनी अधिक असल्याचे कस्टम अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अमली पदार्थ तस्करीला मागे टाकत सोन्याचे पुन्हा तस्करीत अव्वल स्थान मिळविले असल्याचेही हे अधिकारी सांगतात. गतवर्षात मिळून १२.८६ कोटी रूपये किमतीचे सोने पकडले गेले होते.

सरकारने सोने तस्करीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळांवर कडक नजर ठेवली आहे. त्यातही पश्चिम आशियाई देशांतून येणार्‍यां प्रवाशांवर अधिक लक्ष केंद्रीत केले गेले आहे. गेली दोन दशके सोन्याची तस्करी जवळजवळ बंद होती मात्र आयात शुल्कातील वाढ आणि रिझर्व्ह बँकेने सोने व्यावसायिकांवर घातलेली बंधने यामुळे पुन्हा ही तस्करी भरभराटीस येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यावर्षात सोने तस्करी २५० कोटी रूपयांवर जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

अर्थमंत्रालय सध्याच्या परिस्थितीत सोने आयात शुल्कात कपात करण्याची अजिबात शक्यता नाही. परिणामी सोने तस्करीचे प्रमाण वाढण्यात त्याची परिणिती होणार आहे. कस्टम अधिकार्‍यांना संबंधित दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे व कडक शिक्षा देण्याचे अधिकार दिले गेले असले तरी त्यासाठी कायद्यात दुरूस्ती होणे गरजेचे आहे. मे महिन्यात १६२ टन सोने आयात केले गेले होते ते प्रमाण जून मध्ये अवघे ३१ टनांवर आले होते. याचाच अर्थ बाकी सोने तस्करीमार्गेच भारतात आले असल्याचे कस्टम अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

तस्करी मार्गे जे सोने येत असते त्यातील पाच ते दहा टक्के सोनेच कस्टम विभागाकडून पकडले जाते व बाकी कस्टमची नजर चुकवून बाहेर काढले जाते असेही कांही जाणकारांचे मत आहे.