मुंबई – मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी सुरेश भगत यांची पत्नी जया आणि मुलगा हितेशसह अन्य चारजणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून येत्या 29 जुलैला या दोषींवर शिक्षा सुनावली जाणार आहे. या हत्येप्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करीत असताना मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारावर सहा जणांना आज सत्र न्यायालयाने दोषी जाहीर केल आहे
मटका किंग सुरेश भगत यांचा करोडोचा मटक्याचा पैसा आणि अमाप संपत्ती मिळविण्याकरिता पत्नी जया भगत आणि मुलगा हितेश भगत यांनी कट रचून सुरेश भगत यांची हत्या घडवून आणली. त्यासाठी या दोघांनी कुख्यात गुंड अरुण गवळीचा साथीदार सुहास रेगेला 45 लाखांची सुपारी दिली होती. मिळालेल्या 45 लाखांच्या सुपारीनंतर 13 जून 2008 ला अलिबाग – पेन रोडवर सुहास रेगेसह प्रवीण शेट्टी, किरण आंबले आणि हरीश मांडवकर यांनी सुरेश भगत यांच्या चारचाकी गाडीस अपघात घडवून आणला. यात सुरेश भगतसह अन्य सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या हत्याकांडाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करीत होती . या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेले जया भगत आणि हितेश भगत हे दोघेही तब्येतीचे कारण पुढे करून अनेकदा रुग्णालयांत दाखल होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
संपत्तीच्या हव्यासापोटी पत्नी आणि मुलाने कटकारस्थान रचून सुरेश भगत यांची हत्या घडवून आणली. या हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी करून ठोस पुरावे गोळा केले. या पुराव्यांच्या आधारे आज सत्र न्यायालयाने जया भगत, हितेश भगत यांच्यासह सुहास रेगे प्रवीण शेट्टी , किरण आंबले आणि हरीश मांडवकर या सहा जणांना दोषी ठरविले असून येत्या सोमवारी यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.