मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी दिला राजीनामा


अमृतसर – आगामी काळात काँग्रेसमध्ये राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असून, काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहे. राजकीय वर्तुळात काँग्रेसमधील बदलांची चर्चा सुरू असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची प्रशांत किशोर यांनी साथ सोडली आहे. ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.

रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावाची केंद्रीय राजकारणात पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागल्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या केंद्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान दिले जाणार असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा देणारे वृत्तच आता समोर आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला आहे. ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्यामुळे अमरिंदर सिंग यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

प्रशांत किशोर यांनी सार्वजनिक आयुष्यातून थोडा वेळ विश्रांती हवी असल्याचे कारण देत राजीनामा दिला आहे. काही काळ सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना असल्यामुळे मुख्य सल्लागार पदाची कामे करण्यासाठी मी सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील वाटचालींबद्दलही निर्णय घ्यायचा असून, मी आपल्याला विनंती करतो की, मला या जबाबदारीतून मुक्त करावे, असे प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.