शरद पवारांकडून अमित शहांना पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी खास निमंत्रण


मुंबई – काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट झाली. या भेटीनंतर आता पवार-शहा यांची पुण्यात पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या भेटीवेळी अमित शहा यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमासाठी अमित शहा पुण्यात येणार आहेत. पुण्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पवारांनी शहा यांना शुगर इन्स्टिट्यूटच्या भेटीसाठी खास निमंत्रण दिले आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आल्यानंतर भेट घेतली होती. मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ३ ऑगस्ट रोजी सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ब्रेकफास्ट मीट आयोजित केलेले असताना दुसरीकडे शरद पवार यांनी अचानक भेट घेतल्यामुळे भेटीच्या कारणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण, साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित विषयावर शहा यांची भेट घेतल्याचे पवारांनीच स्पष्ट केले.

शरद पवार यांनी या भेटीतच अमित शहा यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचे निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची बैठक सुरू असतानाच अमित शहांनी पुण्यात येणार असल्याची माहिती पवारांना दिली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त येणार असल्याचे शहा म्हणाले. त्यावर शरद पवारांनी शहा यांना पुण्यात आलात, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आवर्जून भेट देण्याची विनंती करत निमंत्रण दिले आहे.

शरद पवार यांनी शहा यांची भेट घेतल्यानंतर शहा यांना एक पत्र दिले होते. त्या पत्राची प्रत त्यांनी ट्वीट केली होती. साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आम्ही अमित शहा यांचे लक्ष वेधलंे. यामध्ये साखरेला हमीभाव आणि साखर कारखान्यांच्या परिसरातच इथेनॉल मॅनिफॅक्चरिंग युनिट बसवणे या गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला आशा आहे की या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्री त्या सोडवण्यासाठी पावले उचलतील, असे शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.