कांदा निर्यात बंदीला शरद पवार यांचा विरोध

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीला केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी विरोध दर्शविला आहे. देशात कांद्याचे भाव वाढत चालल्यामुळे केंद्र सरकार निर्यातबंदीचा विचार करत आहे, पण कांद्याची भाववाढ ही तात्पुरती आहे. त्यामुळे तिच्याने घाबरून जाऊन निर्यातबंदी लादण्याची गरज नाही, असे श्री. पवार यांनी म्हटले आहे.

भारत हा कृषी प्रधान देश तर आहेच, पण जगाच्या बाजारपेठेत कृषी माल पाठविणारा मोठा देश ठरलेला आहे. तेव्हा स्थानिक बाजारपेठेत थोडीङ्गार भाववाढ झाली म्हणून आपण निर्यातबंदी लादायला लागलो तर जगाच्या बाजारपेठेत आपली प्रतिमा डागाळेल, असे पवार यांनी म्हटले आहे.

केवळ कांदाच नव्हे तर अन्य कोणत्याही कृषी मालाच्या निर्यातीवर बंदी लादता कामा नये, असे सांगत असतानाच श्री. शरद पवार यांनी कृषी मालाच्या निर्यातीतून देशाला मिळालेल्या उत्पन्नाचे आकडेच सांगितले. २०१२-१३ या वर्षी भारताला शेतीमालाच्या निर्यातीतून एक लाख ८६ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१३-१४ या वर्षात त्यातून दोन लाख ३३ हजार कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.