
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबदारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असे आवाहन पवार यांनी केले होते. दरम्यान आता यावरुन राजकारण सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात….शरद पवारांना अतुल भातखळकरांचा टोला
दोन बातम्या आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केल्या आहेत. एका बातमीमध्ये पूरग्रस्त भागातील दौरे नेत्यांनी टाळा, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. तर दुसरी बातमी आमदार रोहित पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज कऱ्हाडमध्ये जाणार असल्याची आहे. या दोन बातम्यांचा संदर्भ घेत अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात. त्यामुळे बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
