बकरी ईदसाठी नियम शिथिल का?, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा केरळ सरकारला सवाल


नवी दिल्ली – शुक्रवारी कोरोनासंदर्भातील नवीन नियमांची केरळच मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी घोषणा केली आहे. काही नियमांमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सूट देण्यात आल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने केरळ सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून न्यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणावर आता उद्या (मंगळवार) सुनावणी होणार आहे. सध्या या निर्णयावर कोणतेही मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले नाही. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रा रद्द केल्यामुळे त्या संदर्भातील याचिका बंद करण्यात आली आहे.

केरळ सरकारने ‘बकरी ईद’च्या कालावधीमध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत नियमांमध्ये सूट दिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते, असे आयएमएचे म्हणणे आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असतानाही सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचे मत देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असणाऱ्या आयएमएने व्यक्त केले आहे. ही सूट दिल्यामुळे राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची चिन्ह असल्याचे संकेत एमआयएने दिले आहेत.