जयंत पाटील यांनी सांगितले शरद पवार आणि मोदींच्या भेटीचे कारण!


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोन शीर्षस्थ नेत्यांची जवळपास तासभर भेट झाली. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? या मुद्द्यावर वेगवेगळे राजकीय तर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रातील राजकारण, शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चा, स्वतंत्र सहकार खाते आणि राज्यातील सहकार क्षेत्र, राज्यातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अशा अनेक मुद्द्यांचे अंदाज बांधले जात होते. पण, शरद पवारांनी नेमकी कशासाठी पंतप्रधानांची भेट घेतील होती, याविषयी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारण स्पष्ट केले आहे.

या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. देशाच्या वेगवेगळ्या भागातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयांवर देखील चर्चा झाली असण्याची शक्यता बोलून दाखवली. शरद पवार आणि ए. के. अँटनी यांच्यासोबत काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चा केली होती. त्यामुळे शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयांवर देखील मोदींशी चर्चा केली असेल. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील माझ्याकडे नाही. पण मला शरद पवारांनी सांगितले होते की या सगळ्या विषयांवर मी पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितली आहे आणि मी त्यांची भेट घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी नमूद केले.