पश्‍चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्यावर गोळीबार

माल्दा (प. बंगाल) – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री ए. एच. खान चौधरी यांच्यावर आज पश्‍चिम बंगालमध्ये गोळीबार झाला. माल्दा येथे ही घटना घडली. खान चौधरी सुरक्षित असून सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.

पश्‍चिम बंगालमध्ये सध्या पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमुळे ते प्रचारासाठी माल्डा जिल्ह्यातील एका गावात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली. त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. तसेच गाडीच्या दिशेने गावठी बॉम्ब फेकल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.

या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच रॅलीवर गोळीबार करून गावठी बॉम्ब फेकले, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.