पंतप्रधानपदाचे उमेदवार

शरद पवार यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्यात गैर ते काय ? ते अनुभवी मंत्री आहेत. तेव्हा त्यांनी हे स्वप्न पाहिले पाहिजे असे समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी म्हटले आहे. पवारांनी स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही आणि तसे मुलायमसिंग यांनी म्हणणे यातही काही चूक नाही पण पवारांची अशी उमेदवारी मुलायमसिंगांनी जाहीर करण्याने आता या मैदानात चार खेळाडू उतरले आहेत. मायावती यांनी गेल्या आठवड्यात स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केली आहे. नरेन्द्र मोदी आहेतच. नाही नाही म्हणत राहुल गांधी यांचे नाव पुढे येणारच आहेे. आता पवारांची टोपी या रिंगणात मुलायमसिंग यांनी भिरकावली आहे. खऱे तर हा विषय संपला होता पण तो पुन्हा ऐरणीवर आला आहे. पवारांनी मागेच एकदा खुलासा केला आहे की, आपल्या हातात फार १५ खासदार असू शकतात. अशा स्थितीत आपल्या पंतप्रधानपदाची चर्चा करणे अयोग्य आहे आणि आपण स्वत:ही तसा काही विचार करीत नाही. पवार काहीही म्हणत असले तरीही त्यांच्या चाहत्यांना पवार कधी ना कधी पंतप्रधान होतील अशी आशा वाटतच असते. त्यांंनी ती अनेकदा बोलूनही दाखवली आहे. देशात सध्या आघाड्यांचे युग असल्याने काहीही होऊ शकते. मग पवार पंतप्रधान का होणार नाहीत ? असा प्रश्‍न पवार प्रेमींनी विचारला आहे.

खरेच या आघाड्यांच्या राजकारणात काहीही होते म्हणजे अक्षरश: काहीही होते. अगदी देवेगौडाही पंतप्रधान होऊ शकतात. ते या पदाला अयोग्य होते असे काही म्हणायचे नाही पण त्यांना स्वत:ला आपण कधी पंतप्रधान होऊ असे चुकूनही वाटले नव्हते तरीही ते पंतप्रधान झाले. पवारांच्या मनात काय आहे हे माहीत नाही पण त्यांनी मागेच हा विचार बंद केला होता. आता मुलायमसिंग यांनी हा विषय नव्याने खुला केला आहे. काही लोकांना पवार उमेदवार म्हणून योग्य नाहीत असे वाटते. पण राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार होत असतील तर पवारच काय पण या देशातला कोणीही पदवीधर तरुण उमेदवार होऊ शकतो. पण आता मुलायमसिंगांना पवारांची अशी आठवण का झाली? या आधी त्यांनी महाराष्ट्रात येऊन एक सभा घेऊन समविचारी पक्षांची आघाडी तयार होऊ शकते असे सूचित करून पवारांचे नाव न घेता पवारांना साद घातली होती. या घटनेला आता सहा महिने होऊन गेल्याने तिची आठवण कोणालाही राहिलेली नव्हती. आता मुलायमसिंग यांनी निवडणुका जवळ येतातच हा मुद्दा काढला आहे.

पवारांनाही ही चर्चा आवडत असणार पण त्यांना आताच मुलायमसिंग यांच्याप्रमाणे उघडपणे बोलता येत नाही कारण पवारांचे घोंगडे संपुआघाडीत अडकले आहे. ते केन्द्रातही मंत्री आहेत आणि महाराष्ट्रातही त्यांनी कॉंग्रेसशी युती करून सरकार स्थापित केले आहे. या २०१४ सालच्या निवडणुकीनंतर काय चित्र असेल आणि आपल्याला केन्द्रात कोणती भूमिका बजावण्याची संधी मिळेल यावर पवारांचे काही तरी चिेंतन असणारच. ते त्यांना बोलून दाखवता येत नाही. पवारांसारख्या काही नेत्यांनी तिसरी आघाडी तयार करण्याच्या चर्चा सुरू केल्या होत्या. त्यांची खूप टिंगल झाली. पण आता या निवडणुकीच्या मैदानात नरेन्द्र मोदी हा नवा घटक अनपेक्षित वेगाने येऊन प्रवेशला आहे. मोदी यांना भाजपातून विरोध असल्यामुळे त्यांना इतक्या तातडीने मैदानात उतरवणे शक्य होणार नाही असे सर्वांनाच वाटले होते. पण भाजपाने आणि मोदी यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मोेदी यांनी आक्रमकपणे आपल्या एकेक युक्त्या राबवायला सुरूवात केली आहे. त्यांना कॉंग्रेसचे नेते उत्तर देत बसले आहेत. म्हणजे कॉंग्रेसचे नेते प्रतिक्रियावादी झाले आहेत. ते मोदी यांच्यामुळे धास्तावले आहेत. याला काय करावे असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. जनता आणि त्यातल्या त्यात तरुण मुले आणि मुली मोदींच्या भाषणावर खुष झाले असून ते मोदी आणि राहूल गांधी यांची तुलना करायला लागले आहेत.

ही तुलना जशी वाढत जाईल तसे राहुल गांधी हे मोदींसमोर फिके आहेत हे अधिक गडदपणाने दिसायला लागणार आहे आणि त्याचा परिणाम नाही म्हटले तरी कॉंग्रेसला भोगावा लागणार आहे याची जाणीव सोनिया गांधी यांना झाली आहे. आता मोदींचा प्रभाव पुसून टाकायला कॉंग्रेसच्या भात्यात अन्न सुरक्षा योजना हा एकमेव प्रभावी बाण आहे. निदान कॉंग्रेस पक्षाला तरी तो प्रभावी वाटत आहे. म्हणून ही योजना लवकरात लवकर लागू करण्यास सोनिया गांधी उतावीळ झाल्या आहेत. त्याचा नेमका काय आणि किती फायदा होईंल याचा अंदाज आताच येत नाही पण येत्या तीन ते चार महिन्यांत चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकहा होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागले तर त्यांना लोकसभा निवडणुकीत जरा उमेदीने उतरता येणार आहे पण त्यांना मार बसला तर भाजपाचे मनोधैर्य वाढणार आहे. मात्र या सेमीफायनलमध्ये या दोन पक्षांत फिफ्टी फिफ्टी झाले तर तिसर्‍या आघाडीचे मनोबल वाढणार आहे. त्या स्थितीत मुलायमसिंग यादव, नितीशकुमार, जयललिता, शरद पवार, मायावती या प्रादेशिक नेत्यांचे महत्त्व वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कसलीही स्थिती आकाराला येऊ शकते. त्यात पवारांना संधी हवी असेल तर त्यांना किमान १५ खासदार निवडून आणावे लागतील. आताही स्थिती त्याला अनुकूल नाही पण लोकसभा निवडणुकीपर्यंत वातावरण बदलूही शकते.

Leave a Comment