मला काहीच कल्पना नव्हती- राहुल द्रविड

नवी दिल्ली- स्पॉट फिक्सिंगबाबत दिल्ली पोलिसांनी प्रथमच राजस्थान रॉयलचा कर्णधार राहूल द्रविडची चौकशी केली. या प्रकरणाचा साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या प्रकरणी मला कोणतीच कल्पना नव्हती. ‘त्या’ तिन्ही खेळाडूंवर मला तसा कधीच संशय आला नाही’, असे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार राहुल द्रविड याने जबाबात स्पष्ट केले आहे. आगामी काळात पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही द्रविडने यावेळी दिले.

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला हे खेळाडू अडकले आहेत. तिघांना स्पर्धा सुरू असतानाच बुकींशी संबध असल्यावरुन अटक करण्यात आली होती. त्यापैकी श्रीशांत आणि अंकित हे सध्या जामीनावर सुटले आहेत, तर चंडिला अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणात राजस्थान संघाचा कर्णधार या नात्याने पोलिसांनी द्रविडचा जबाब नोंदवला आहे. पुढील तपासासाठी पोलिसांना द्रविडचा जबाब महत्वपूर्ण ठरणार आहे.

द्रविडचा क्रिकेटमधील लौकीक व स्वच्छ प्रतिमा लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी त्याच्या घरी जाऊनच जबाब नोंदवल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय दंड विधानातील कलम १६२ अनुसार द्रविडचा जबाब घेण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या मते, द्रविड राजस्थान संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या निवडीत त्याचाही सहभाग असणारच. ती बाब लक्षात घेऊनच राहुलचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही द्रविडने दिल्याचे या अधिका-याने नमूद केले. द्रविडच्या चौकशीनंतर साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवला गेल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.