भारतातील पाच नंबरची आयटी सेवा पुरवठादार कंपनी असलेल्या टेक महिन्द्राने चेन्नईच्या पोलॅरिस फायनान्शियल टेक्नॉर्लाजी या आयटी सेवा व्यवसाय कंपनीच्या खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे वृत्त आहे. उद्योग वर्तुळातील वरीष्ठ अधिकार्यानी दिलेल्या माहितीनुसार या खरेदीसंबंधी चर्चेची पुढची पायरी नुकतीच पार पडली असून पोलॅरिस कंपनीला अपेक्षित असलेली किंमत देण्याची तयारी महिन्द्राने दाखविली आहे. त्यासंबंधीची अधिकृत घोषणा येत्या दोन आठवड्यात होईल अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी मुंबईच्या एल अॅन्ड टी इन्फोटेकनेही पोलॅरिस खरेदीची बोलणी केली होती मात्र ती यशस्वी झाली नाहीत. पोलॅरिस सेवा व्यवसाय कंपनीचे महसूल ३३० दशलक्ष डॉलर्स म्हणजे १८१३ कोटी रूपये इतका असून कंपनीने ४०० दशलक्ष डॉलर्सची अपेक्षा व्यक्त केली होती असे समजते. महिन्द्राने सत्यमचे विलीनीकरण करून घेतल्यानंतर नॉन टेलिकॉम क्षेत्राबाबतही गंभीरपणे विचार सुरू केला होता.
महिन्द्राच्या सध्याच्या महसूलातील निम्मा महसूल हा टेलिकॉम क्षेत्रातूनच येतो. ब्रिटीश टेलिकॉम हा त्यांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र आता कंपनी बँकींग, वित्त सेवा, इन्शुरन्स या क्षेत्रातही पावले रोवण्याचा विचार करत आहे आणि त्या क्षेत्रात वेगाने विकास करण्यासाठी पोलॅरिस महत्त्वाची कामगिरी बजावू शकणार आहे असे सांगितले जात आहे.