मोदींच्या भाषणाला पाच रुपये तिकीट

हैदराबाद – भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची मोहीम सुरू झाली असून त्यांनी प्रचाराचे एकेक नवे फंडे शोधून काढून लोकांना प्रभावित करायला सुरुवात केली आहे. ते काही तरी असा नवा प्रकार करतात की, त्यांच्या विरोधी कॉंग्रेस नेत्यांच्या हातात त्यांच्या त्या प्रकारावर टीका-टिप्पणी करण्याशिवाय काहीही उरत नाही. मोदी नवेनवे पाऊल टाकत आहेत आणि कॉंग्रेस त्यांच्या मागे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत फरपटत चालली आहे.

पुढच्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा हैदराबाद येथे होणार आहे. परंतु त्यांची सभा ऐकायला येणार्‍यांना पास घेऊन यावे लागणार आहे. तो पास प्राप्त करण्यासाठी पाच रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या मार्गाने जमा होणारा पैसा उत्तराखंडातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाईल. मोदींचे भाषण ऐकण्यास हैदराबादची जनता एवढी उत्सुक आहे की, पाच रुपये देऊन सदर पास हस्तगत करण्यासाठी लोकांची आतापासून झुंबड उडाली आहे.

आंध्र प्रदेशातील भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४० हजार लोकांनी पैसे दिले आहेत. या युक्तीमागे उत्तराखंडातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भावना तर आहेच, पण मोदी किती लोकप्रिय आहेत हे दाखवून देणे हाही हेतू आहे. कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या भाषणाला अशा रितीने पैसे देऊन गर्दी होत नाही. मोदींइतका प्रभावी नेता कॉंग्रेसमध्ये नाही हे दाखवून देण्याचा भाजपाचा हेतू आहे.

सध्या तर कॉंग्रेसमध्ये असा कोणताही नेता नाही. आज नरेंद्र मोदी यांच्याशी ज्यांची तुलना केली जात आहे त्या राहुल गांधींच्या भाषणाला सुद्धा मोदींच्या भाषणाएवढी गर्दी होत नाही, हे यातून दिसून आले आहे. भारताच्या इतिहासात आजपर्यंत तरी कोणत्याही राजकीय नेत्याचे भाषण असे तिकीट लावून झालेले नाही. असे पैसे देऊन मोदींच्या भाषणाला ७० हजार लोक येतील, असा अंदाज आहे.