डब्लीन दि.१२ – मातेच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर अशा केसमध्ये गर्भपात करण्यास मंजुरी देणारा कायदा सनातन कॅथॉलिक देश समजल्या जाणारया आयर्लंडमध्ये नुकताच मंजूर करण्यात आला. आयर्लंड कोअॅलिशन पार्टीने या संबंधीचा ठराव १२७ विरूद्ध ३१ मतांनी मंजूर केला असल्याचे समजते. पंतप्रधान इंडा केनी यांनी प्रोटेक्शन ऑफ लाईफ प्रेगन्सी बिल संसदेत मांडले होते. विशेष म्हणजे या वेळी गर्भपात विरोधी गटांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर या बिलविरोधात निदर्शने केली होती.
भारतीय डेन्टीस्ट सविता हलप्पनवार या महिलेचा गतवर्षी वेळेवर गर्भपात न केल्यामुळे मृत्यू झाला होता. आयर्लंड मध्ये गर्भपातास बंदी आहे. सविता १७ आठवड्याची गरोदर होती मात्र तिला आपले अॅबॉर्शन झाले असावे अशी शंका येत होती आणि तिला वेदनाही खूप होत होत्या. मात्र ज्या रूग्णालयात तिला दाखल केले गेले, तेथे गर्भाचे ठोके ऐकू येत असल्याचे कारण देऊन तिचा गर्भपात करण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता. अखेर गर्भाचे ठोके थांबेपर्यंत सविता गंभीर झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर या केसची चौकशी करताना केलेल्या तपासण्यात वेळेवर गर्भपात केला गेला असता तर सविताचा जीव वाचू शकला असता असा अहवाल तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दिला होता.
यावर देशभरातून अनेक विरोधी प्रतिक्रया उमटल्या होत्या आणि मातेच्या जीवालाच गर्भामुळे धोका निर्माण होत असेल तर अशा गर्भपातांना मंजुरी असावी असा सूर जगभरातून उमटू लागला होता. आयर्लंड सरकारला अखेर त्याची दखल घ्यावी लागली आणि या कायद्याला मंजुरी देण्यात आली