मंत्र्यांनी केला शासकीय बंगला ‘साफ’

मुंबई: सरकारी निवासस्थान सोडताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सात लाखांचे सामान लंपास केल्याची लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. ढोबळे यांनी मालकीचे नसलेले फर्निचर, सोफा, इलेक्ट्रिकल साहित्य, गॅस, सिलेंडर, वेंटिलेटर, पडदे आणि पंखेही नेल्याची तक्रारीत सार्वजनिक बांधकाम खात्याने म्ह्टले आहे. ढोबळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ताशे-यानंतर मुंबईतील शासकीय घर सोडले खरे, पण ते सोडत असताना संपूर्ण घर ‘साफ’ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याबाबत माजी मंत्री ढोबळे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

राज्यातील मंत्र्यांसाठी सरकारतर्फे एक निवासस्थान दिले जाते. काही जण स्वत:च्या सोयीनुसार सरकारचे लाखो रुपये खर्च करुन नुतनीकरण करतात. मात्र मंत्रिपद गेल्यानंतर हे निवासस्थान सोडण्याची वेळ येते. मंत्रिपद गेल्याने निवासस्थान सोडण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ढोबळे यांच्यावर आली. मात्र बंगला सोडताना तिथला टेबल फॅन, सोफा, कपाट, पडदेही सोबत घेऊन गेले, असे सांगण्यात येत आहे.

माजी मंत्री ढोबळें यांनी आठ दिवसांपूर्वी निवासस्थान सोडले, त्याचवेळी ते सामान घेऊन गेल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाली. त्यानंतर पाहणी करुन सात लाखांचे सामान लंपास झाल्याची तक्रार विभागाने नोंदवल्याचे समजते. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन गुरुवारी संपूर्ण प्रकराचा खुलासा करु आणि त्यानंतरच प्रतिक्रिया देऊ, असे ढोबळे यांनी सांगितले.