रेंटब्रिज – ऑस्ट्रेलिया- इंग्लंड संघा दरम्यानच्या अशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचे मिळून १४ विकेटस पडल्या आहेत. पहिल्याच दिवशी १४ विकेटस पडल्याने या कसोटीचा निर्णय लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलच्या धारदार आणि स्विंग गोलंदाजीपुढे यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. सिडलने ५० धावा देत निम्मा संघ गारद केला. त्यामुळे इंग्लंडला केवळ २१५ धावाच करता आल्या. तर ऑस्ट्रेलियाची सुरूवात देखील निराशाजनकच झाली असून त्यांची अवस्था ४ बाद ७५ अशी झाली होती.
अशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी सिडलने प्रभावी मारा करताना इंलंडला जेरिस आणले. सिडलेने आऊट स्विंगवर जो. रुट (३०), जोनाथन ट्रॉट (४८), इयान बेल (२५), केविन पीटरसन (१४) आणि मॅट प्रायर (१) यांना तंबूचा रस्ता दाखविला. चहापानाच्या वेळेपर्यंत इंग्लंडची अवस्था ६ बाद १८५ झाली होती. पुढच्या चार फलंदाजाना केवळ ३० धावा करता आल्या.
दुसरीकडे धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही निराशाजनकच झाली. सलामीवीर शेन वॉटसन १३ धावांवर बाद झाला. कर्णधार मायकेल क्लार्क (०) आणि कोवान (०) यांना तर भोपळा सुद्धा फोडता आला नाही. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून ७५ धावा केल्या. स्टिवन स्मिथ ३८ धावांवर खेळत होता. पहिल्याच दिवशी १४ विकेटस पडल्याने या कसोटीचा निर्णय लागणार आहे.