मुंबई : भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार असल्याचे जाहीर झाले असले तरी या दौर्यात एकदिवसीय सामने किती खेळवावेत यावरून मतभेद असल्याचे उघड झाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने (सीएसए) या संबंधात खुलासा केला असून याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय) शी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.
भारताचा संघ नोव्हेंबर मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर जाईल आणि १९ जानेवारीपर्यंत हा दौरा चालेल. असे बीसीसीआयने म्हटले आहे. परंतु भारतीय संघाला हा दौरा आटोपून ताबडतोब न्यूझीलंडला जायचे असल्यामुळे संघाला विश्रांतीची गरज भासणार आहे. सध्या जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार संघाला एक आठवड्याचीही विश्रांती मिळत नाही. ती अधिक मिळावी म्हणून ७ ऐवजी ५ एकदिवसीय सामने खेळवले जावेत असे सुचविले जात आहे.
त्याशिवाय एकदिवसीय सामने आधी घ्यावेत की कसोटी सामने आधी घ्यावेत यावरही मतभेद आहेत. सीएसएने दौर्याचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी यासंबंधात बीसीसीआयला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी नाराज आहेत. आता सीएसएने सुधारित दौरा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी बीसीसीआयच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
