
नवी दिल्ली – आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाकडून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. ८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जून रोजी होईल.
अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी मोठा दिलासा!
नवनीत कौर यांनी मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. नवनीत कौर यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने बनावट घोषित केले होते. यासह उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात नवनीत कौर यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नवनीत कौर यांचे लोकसभा सदस्यत्व धोक्यात आले होते.
नवनीत राणा या २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड. सी. एम. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली होती.
नवनित राणा यांनी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया देतांना शिवसेनेवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, या प्रकरणात कोणी राजकारण केले हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझी आणि शिवसेनेची लढाई सर्वांना माहिती आहे. मी हा लढा गेले ८ ते ९ वर्ष लढत आहे. अचानक न्यायालयाचा निर्णय येणे म्हणजे यामध्ये राजकारणाची खिचडी शिजली आहे.
