
पुणे – पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भाजप नगरसेवक आनंद रिठे यांनी एका नागरिकाला आता इमारतीवरील मोबाईल टॉवर देखील काढून टाकले आहेत. आता घरे देखील पाडणार असल्याची धमकी दिली. या व्यक्तीने या धमकीमुळे वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून भाजप नगरसेवकाविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील भाजप नगरसेवकाच्या छळाला कंटाळून एकाची आत्महत्या; गुन्हा दाखल
दत्तवाडी येथील महादेव इमारतीमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय संजय सुर्वे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुर्वे यांना नगरसेवक आनंद रिठेंनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे हे दत्तवाडी परिसरात राहत होते. एका मोबाईल कंपनीचा टॉवर त्यांच्या इमारतीवर बसवण्यात आला होता. तुम्ही मला पैसे द्या, अन्यथा मोबाईल टॉवर काढून टाकला जाईल, अशी धमकी भाजप नगरसेवक आनंद रिठे यांनी संजय सुर्वे यांना दिली.
अनेक वेळा पैशांची रिठेंनी मागणी करून देखील सुर्वेंनी पैसे न दिल्यामुळे नगरसेवक रिठे यांनी पुणे महापालिकेत संजय सुर्वे यांच्या इमारतीवरील मोबाईल टॉवर काढून टाकण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर हा टॉवर काढून टाकण्यात आला. टॉवर काढून टाकल्यानंतर रिठेंनी, आता टॉवर काढले असून पुढे घर देखील पाडणार अशी धमकी सुर्वे यांना दिली. रिठे सुर्वेंना अनेकदा घर पाडण्याच्या धमक्या द्यायचे.
सुर्वे यांनी या मानसिक त्रासाला कंटाळून दत्तवाडी परिसरातील पौर्णिमा सायकलच्या दुकानात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची दखल पोलिसांनी सुर्वे यांचा मुलगा शशांकने दिलेल्या तक्रारीनंतर घेतली आहे. नगरसेवक आनंद रिठेंविरोधात शशांकने अधिकृत तक्रार नोंदवली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
