पुणे- बोधगया साखळी स्फोट प्रकरणी संशयित दहशतवादी मकबूलने या साखळी स्फोटांची माहिती 2012 साली तपास यंत्रणांना दिली होती. मकबूल हा पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील संशयित आरोपी आहे. या स्फोटांच्या चौकशीदरम्यान मकबूलने हा खुलासा केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा
मकबूलची चौकशी होण्याची शक्यता आहे.
बॉम्बस्फोट बोधगयात; कनेक्शन पुण्यात?
बोधगयावरचा हल्ला दहशवादी हल्लाच असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी दिलीय. तपास यंत्रणांकडून या स्फोटांचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे. बुद्धगया स्फोटामध्ये तेथील मंदीर सुरक्षित आहे. पण मंदीरातील पवित्र बोधीवृक्षाचं नुकसान झालंय. याच बोधिवृक्षाखली राजकुमार सिद्धार्थला सत्याचा बोध झाला आणि त्यानंतर ते गौतम बुद्ध बनले. त्यामुळे या वृक्षाला बौद्धधर्मीयांमध्ये मोठं श्रद्धेच स्थान आहे.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंदीराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून त्याच्या आधारे याचा तपास करण्यात
येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कोण आहे मकबूल…
मूळचा नांदेडचा रहिवासी असलेला मकबूल हा इंडियन मुजाहिद्दीनचा आयईडी एक्सपर्ट म्हणून काम पाहत होता. 1999 मध्ये मकबूलनं इंडियन मुस्लिम मोहमद्दीन मुजाहिद्दीन नावाची संघटना बनवली. समाज सुधारणा करण्याचा दावा करत मकबूलकडून ही संस्था स्थापन केली होती. समाजसुधारणेच्या नावाखाली या सघटनेमार्फत ठिकठिकाणी दहशतवादी कारवाया उघडकीस आल्या होत्या. मकबूलचा 2000 सालच्या हैदराबाद स्फोटात हात असल्याचं उघड झाले होते. तसेच पुणे जर्मन बेकरी स्फोटात मकबूल संशयित आरोपी आहे.
