गोव्यात सापडले 9 मानवी सांगाडे

गोवा- गोव्यातल्या पणजीपासून 35 किमी अंतरावर असलेल्या फोंडा नदी शेजारील शिरोडा गावातल्या उंच टेकडीवर नऊ मानवी सांगाडे आढळल्याने एकच
खळबळ उडाली आहे. हे सांगाडे जिथे सापडले आहेत. त्याच्या हाकेच्या अंतरावर होमीयोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आहे. पोलिसांनी येथील दोन कर्मचार्‍यांची चौकशीही केली आहे.

शिरोडे गावात डोंगरावरील निर्जळस्थळी काही अनधिकृत बांधकाम होतं असल्याची माहिती गावचे सरपंच संदेश प्रभूदेसाई यांना मिळाल्याने ते तिथे पाहणी करण्यास गेले होते. त्यावेळी प्रथमदर्शनी एका खड्ड्यात प्रभुदेसाई यांना दोन मानवी सांगाडे दिसले. ते आणखी जवळ गेले असता त्यांना त्याच जागी आणखीन सात मानवी सांगाडे आढळले. घटनेचे गांभिर्य पाहता प्रभुदेसाई यांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली.

दरम्यान, शिरोडा गावात ज्या ठिकाणी सांगाडे सापडलेत. तेथून हाकेच्या अंतरावर होमीयोपँथिक वैद्यकीय महाविद्यालय आहे. या सांगड्यांवर काही केमिकल आढळले. त्यामुळं शव विच्छेदनासाठी आणलेले हे बेवारस मृतदेह असावेत. तसेच या मृतदेहांचि विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना इथं पुरलं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोघा कर्मचार्‍यांची पोलिसांनी चौकशी देखील केली असल्याचे फोंडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सी. एल. पाटील यांनी
सांगितले. सध्या हे नऊही मानवी सांगाडे वैद्यकीय अहवालासाठी गोवा मेडीकल कॉलेजला पाठवण्यात आले आहेत. हे सांगाडे कोणाचे असून ते आले कोठून याचा तपास पोलिस करीत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मानवी सांगाडे आढळून आल्याने शिरोडा गावातल्या गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.