खेड्यात उद्योजकता वाढविल्याने मंदीचा त्रास कमी होईल- शरद पवार

बारामती, दि. 5 -युरोप, अमेरिकासारख्या जगाच्या सार्‍या प्रगत भागात सध्या मंदीचे वातावरण आहे. भारतातही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामीण भागात उद्योग सुरु करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात निर्माण होणार्‍या उद्योजकतेच्या संधी याकामी मदत करू शकतील असे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय ग्रामीण उद्योजकता परिषदेचे उद्घाटन करताना बोलून दाखविले.

शहरी व ग्रामीण भागातील उद्योजकांना एकत्र आणून शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि वर्ल्ड आंत्रप्रनर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ग्रामीण आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ विधीज्ञ ड. उज्ज्वल निकम, एन्व्हॉर्यमेंटल फोरम च्या अध्यक्षा सुने्त्रा पवार, वर्ल्ड आंत्रप्रनर्स फोरमचे फ्रान्समधील सहअध्यक्ष प्रा. तुगरुल अटामेर, इंद्रजित सिंग, केंब्रिज ग्लोबल पाटर्नरचे अध्यक्ष डॉ. निखिल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण उद्योजकतेच्या फायद्याविषयी बोलताना पवार म्हणाले, आज भारतातील 70 टक्के जनता खेड्यामध्ये राहते व ती प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. तर उर्वरित जनता शहरामध्ये औद्योगिकीकरणावर अवलंबून आहे. या फरकामुळे देशात सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो.

ग्रामीण उद्योजकतेमुळे यावर तोडगा निघू शकतो असेही ते म्हणाले. चीन, ब्राझील, अर्जेंटिना यांसारख्या देशांनी ग्रामीण उद्योजकतेचा चांगला फायदा करून घेतलेला आहे. तेथे त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवली आहे. परिणामी त्यांच्या देशामध्ये परकीय चलनाचा ओघ वाढला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ग्रामीण भागात शेतीवर अवलंबून असणार्‍या कुटुंबांनी आपल्या पीकपद्धतीमध्ये योग्य तो बदल करायला हवा. तसेच वेगळे उत्पादन घेता येईल का याबाबतही विचार करणे गरजेचे आहे. तसेच आपले उत्पादन जगाच्या बाजारपेठेमध्ये कसे गेले पाहिजे याबाबतही प्रयत्न करायला हवेत. उत्पादनाच्या मूल्यांमध्ये वृद्धी होऊन बाजारपेठेमध्ये नेण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक रोजगार निर्माण होतील. या प्रक्रियेसाठी कौशल्यांचा विकास होणे आवश्यक आहे. याकामी शिक्षणव्यवस्था आपल्याला मदत करेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. ग्रामीण उद्योजकतेचे कौशल्य विकसित झालेल्या युवकाला गावातच राहून रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण प्रेरित केले पाहिजे. यातूनच गावामध्ये शाश्वत विकासाचे मॉडेल तयार होईल असे प्रतिपादन पवार यांनी केले.

याप्रसंगी बोलताना वर्ल्ड आंत्रप्रनर्स फोरमचे फ्रान्समधील सहअध्यक्ष प्रा. तुगरुल अटामेर म्हणाले, आज तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत आहे. या बदलत्या जगाला पुढाकार घेणारे, जोखीम पत्करणारे उद्योजकच वेगळी दिशा देऊ शकतील. शहरीकरणामुळे उद्भवणार्‍या समस्यांवर ग्रामीण उद्योजकता समाधानकारक तोडगा काढू शकेल असा विश्वासही अटामेर यांनी व्यक्त केला.