
पुणे : पुणे महानगरपालिकेकडून (पाणीपट्टी थकविणाऱ्या 856 जणांची यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. यावरुन 200 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेने या सर्व थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे.
निलेश राणे आणि संजय काकडे यांनी थकवली पुणे महापालिकेची तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी
मुख्यतःआणि धक्कादायक म्हणजे नोटीस बजावण्यात आलेल्या यादीमध्ये भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे ( सुमारे 17 लाख रुपये) आणि भाजपचे माजी खासदार संजय काकडे (सुमारे 66 लाख रुपये) यांच्यासह अनेक नामांकित शिक्षणसंस्था सरकारी कार्यालय आणि बिल्डरचा देखील समावेश आहे. यामुळे वसुलीसाठी पुणे महापालिका प्रशासनाकडून कठोर भूमिका घेत नोटीस बजावण्यात आली आहे.
खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या कनेक्शनमुळे थकबाकीने 200 कोटींपर्यंतचा आकडा गाठला आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. म्हणून जर 25 जूनपर्यंत थकबाकी भरली नाही, तर पाणी कनेक्शन कापण्यात येणार असल्याच म्हटले आहे. तसे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. परंतु, वसुलीसाठी महापालिका प्रशासनावर अनेकदा बड्या नेत्यांचे दबाव येत असल्यामुळे थकित रक्कमेची वसुली करणे पुणे महानगरपालिकेला अशक्य होऊन बसते. या दरम्यान, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून यादी जाहीर केली असली, तरी परंतु प्रत्यक्षात ही वसुली होणार का? हा खरा प्रश्न आहे.
