मंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनेलला मानाचे सिल्व्हर प्ले बटन


अकोला – आपल्या डॅशिंग स्वभावामुळे अवघ्या महाराष्ट्राला परिचीत असलेले अकोल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनलला नुकतेच सिल्वर प्ले बटन मिळाले आहे. आज मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना युट्युबकडून सिल्वर प्ले बटन प्राप्त झाले आहे. बच्चू कडू यांना ते बटन आज अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी कार्यालयात सुपूर्द केले.


युट्युबवर व्हिडिओच्या माध्यमातून बच्चू कडू हे समाजातील विविध प्रश्न तसेच अनेक व्हिडीओ टाकून लोकांच्या संपर्कात असतात. अशातच सोशल मीडियावरील त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच याच अनुषंगाने गुगलच्या अमेरिकेतील कार्यालयातून युट्युबवरील फॉलोअर्स 1 लाख 87 हजार झाल्यामुळे सिल्वर प्ले बटन मिळाले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर मंत्री बच्चू कडू हे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. तसेच ट्विटरवर त्यांचे 02 लाख 51 हजार तर फेसबुक वर 07 लाख 2 हजार फॉलोअर्स आहेत. याबरोबरच इन्स्टाग्रामवर 3 लाख 20 हजार लोक त्यांना फॉलो करतात. आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या सिल्वर बटनचा बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला आहे. तसेच यापुढेही जसजसे फॉलोअर्स वाढत जातील, तसतसे युट्युब कडून त्यांना गोल्ड आणि प्लॅटिनम असे वेगवेगळे प्ले बटन मिळत जातील.