परिवहन सेवेतील हे क्रांतीकारी पाऊल – अनिल परब


मुंबई – जनहिताच्या दोन ऑनलाईन सेवांचे लोकार्पण हे या क्षेत्रातील क्रांतीकारी पाऊल असल्याचे सांगतांना परिवहन मंत्री अनिल परब यावेळी म्हणाले की, आजच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गर्दी टाळून विभागाचे नियमित कामकाज सुरु ठेवण्यासाठीही त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विभागामार्फत आतापर्यंत जनहिताच्या ८५ सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याची माहिती परब यांनी यावेळी दिली.

गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे आव्हान आपल्या सर्वांसमोर असतांना विभागाने ऑनलाईन सेवा-सुविधांच्या माध्यमातून नवीन कार्यसंस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवीन वाहन नोंदणीकरिता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येत होती आता अशा पद्धतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली असून यापुढे नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावर तत्काळ नोंदणी होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करुन ई स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. परिवहन आयुक्त ढाकणे यांनी ज्या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या येत्या दोन महिन्यात उपलब्ध करून दिल्या जातील, असे आपल्या आभार प्रदर्शनात सांगितले.