बंगलोर दि.३ – इंटरनेटची सुरवात होण्याच्या काळात म्हणजे ९० च्या दशकात भारताचे डॉट कॉम पोस्टर बॉय म्हणून नावारूपास आलेले राजेश जैन आणि बी.जी.महेश या दुकलीवर आगामी लोकसभा निवडणूकांतील इंटरनेट प्रचाराची जबाबदारी सोपविली गेली असल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने भाजपचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख आणि गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्यासाठीच हे दोघे काम करणार आहेत. मोदींच्या सोशल मिडीया प्रचाराची धुरा त्यांच्यावर सोपविली गेली आहे.
प्रचारासाठी अथवा संपर्कासाठी सोशल मिडियासारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात भारतातील कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांपेक्षा मोदी यांनी घेतलेली आघाडी लक्षणीय आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांत या माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार हे नक्कीच आहे. कारण भारतातील १४ कोटींपेक्षा जास्त युजर पर्यंत पोहोचण्याचा तो सर्वात स्वस्त आणि जलद पर्याय आहे. भारतीय इतिहासात सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जाण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल इतकेच नव्हे तर २०१४ ची निवडणूक ही अशा प्रकारे लढविली गेलेली पहिली राष्ट्रीय पातळीवरील निवडणुक असेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.
मोदींच्या प्रचाराची धुरा सोपविले गेलेले राजेश जैन यांनी त्यांची इंडिया वर्ल्ड सिफीला ९० च्या दशकातच ४९९ कोटी रूपयांना विकून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे तर बी महेश हे इंडिया इन्फो व वन इंडियाचे संस्थापक आहेत. हे दोघेही मोदींच्या कॅम्पेनसाठी स्वतंत्र विभाग तयार करत असून त्यात १०० तंत्रज्ञांची नेमणूक केली जाणार आहे. हे पथक बंगलोरमधूनच काम करणार आहे.
राजेश जैन यांची इंडियन वेब इंडस्ट्रीचे पायोनियर अशीही ओळख आहे. ते स्वतः बीजेपीचे समर्थकही आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळावी यासाठी केवळ तनानेच नव्हे तर मनाने आणि धनानेही काम करण्यास सज्ज झाले आहेत असे भाजपतील सूत्रांकडून समजते.